महानगरपालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीमुळे पाणी पुरवठ्याची विस्कळीत झाला आहे. ही यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी 6 ते 7 दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या या केंद्रातील दोन ट्रान्सफार्मर कार्यरत असून, त्याआधारे 20 पैकी 15 पंप सुरू करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या ट्रान्सफार्मरची दुरूस्ती होईपर्यंत मंगळवारी मध्यरात्रीपासून ते 5 मार्चपर्यंत मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी परिसरात 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.
मुंबईतील पाणी कपातीवरून भाजपाने आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. "मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास आदित्य ठाकरे सर्वस्वी दोषी" असं म्हणत गंभीर आरोप केला आहे. तसेच "30 हजार कोटी मिळूनसुद्धा उदंचन केंद्राला आग लागली कशी? शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहचत कसं नाही? पाणी गळती का होतेय? गळती थांबविण्यासाठीचे टेंडर कोणाला दिले गेले?" असे सवाल देखील विचारले आहेत.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास सर्वस्वी दोषी आदित्य ठाकरे आहेत. गेली 25 वर्षे मुंबई महापालिका तुमच्याकडे आहे. तुम्ही सत्तेत होतात तेव्हा गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईकरांच्या खिशातून तुम्ही 30 हजार कोटी रुपये घेतलेत. माझा आदित्य ठाकरेंना सवाल आहे की 30 हजार कोटी मिळूनसुद्धा उदंचन केंद्राला आग लागली कशी? शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहचत कसं नाही? पाणी गळती का होतेय?"
"गळती थांबविण्यासाठीचे टेंडर कोणाला दिले गेले? या गोष्टी न करण्याचे परिणाम मुंबईकरांना आज भोगावे लागत आहेत. त्या ठिकाणी आता डीप क्लिनींग आणि स्वच्छता होऊ लागली तर यांच्या पोटात दुखायला लागले. आदित्य ठाकरे यांना मुंबईत होणारी विकासकामे, सौंदर्यीकरणाची आणि स्वच्छतेची कामे यामुळे पोटदुखी झाली आहे. त्यामुळे धौतीयोग त्यांना लवकरच मिळावा अशी माझी अपेक्षा आहे" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.