Ashish Shelar : "... अन्यथा मुंबईकरांच्या असंतोषाचा 'पूर' येईल"; भाजपाचा जोरदार हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:59 PM2022-07-01T13:59:14+5:302022-07-01T14:10:28+5:30

BJP Ashish Shelar And Mumbai Rain : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

BJP Ashish Shelar Slams BMC Over Mumbai Rain | Ashish Shelar : "... अन्यथा मुंबईकरांच्या असंतोषाचा 'पूर' येईल"; भाजपाचा जोरदार हल्लाबोल 

Ashish Shelar : "... अन्यथा मुंबईकरांच्या असंतोषाचा 'पूर' येईल"; भाजपाचा जोरदार हल्लाबोल 

Next

मुंबई -  आज मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर, दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. य़ाच दरम्यान भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. 

मुंबईकरांच्या असंतोषाचा "पूर" येईल असं म्हणत टीका केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सालाबादप्रमाणे याहीवर्षी मुंबईची पहिल्या मोठ्या पावसात दैना उडालेय. महापालिकेचे मोठमोठे दावे, कंत्राटाचे, नालेसफाईचे मोठमोठे आकडे, त्यातील कटकमिशन...  सगळं काही तुंबलेल्या पाण्यावर आता "तरंगलेय" पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा मुंबईकरांच्या असंतोषाचा "पूर" येईल!" असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

पश्चिम व पूर्व उपनगरातही अंधेरी सबवे, बांद्रा, पवई, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र पालिकेने सखल भागातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे निचरा करण्यात आला. दुसरीकडे, पावसाची सध्याचा स्थिती पाहता लोकल ट्रेन्सचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे कालपासूनच लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पावसाचा सध्याचा जोर पाहता आजही मुंबईतील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

सुमारे महिनाभराच्या विलंबाने पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे, यामुळे धरणसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली तर मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील कपात मागे घेण्यात येईल. तसेच, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला सुरुवात करता येईल.
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams BMC Over Mumbai Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.