BJP Ashish Shelar News: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षणाबाबत परदेशात केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. आरक्षण रद्द करण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुंबईच्या वतीने भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानाच्या विरोधात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो. राहुल गांधी यांचा आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर उघड झाला आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला याचे उत्तर नक्कीच देईल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
हिंदुस्थानच्या इतिहासतला काळा दिवस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानच्या समानतेचा, समान संधीचा, समान न्यायाच्या आधारावर निर्माण केलेल्या संविधानातून आलेले आमच्या हक्काचे आरक्षण काढून घेतले पाहिजे, अशी भूमिका राहुल गांधींनी परदेशात घेतली हा हिंदुस्थानच्या इतिहासतला काळा दिवस आहे. राहुल गांधी तुमच्यामध्ये हिंमत होती तर आरक्षण काढून टाकण्याचे वक्तव्य निवडणुकीच्या आधी बोलून दाखवायचे होते. भारतातील जनतेने तुम्हाला सळो की पळो करून दाखवले असते. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनवेळा पराभव करण्याचे काम आणि पाप काँग्रेसने केले. संविधानाला नख लावण्याचे काम हा काँग्रेसचा वर्षानुवर्षाचा धंदा राहिला. संविधानातून निर्माण झालेल्या आरक्षणाला तुम्ही नख लावायला निघालात. त्यामुळे काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबतच्या आरक्षण रद्द करण्याबाबतच्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल करण्यात येत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत असताना आरक्षण बंद करणार असे म्हणाले, असा दावा करून या पोस्ट व्हायरल करून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र करण्यात येत असलेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. आपल्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, भारत सर्वांसाठी समान देश होईल तेव्हाच आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. सध्या भारताची स्थिती अशी नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. मात्र काही लोक अर्धेच व्हिडीओ व्हायरल करून त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण करत आहेत.