Ashish Shelar, Mumbai BMC: मुंबई महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. भाजपाने सातत्याने मुंबई पालिकेतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवला आहे. याच दरम्यान आता मुंबई पालिकेत सुमारे ७० हजार कोटींचा नवा घोटाळा झाला असल्याची चर्चा आहे. बिल्डर्सच्या ७० हजार कोटींच्या फायद्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक दर्जा असलेल्या वास्तू त्यांचा घशात घालण्याचा मुंबई पालिकेचा डाव असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या घोटाळयांची मालिका वाढत असून ऐकावे ते नवलंच या पध्दतीने घोटाळयांची प्रकरणे रोज समोर येत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आहे. आता जे नवीन प्रकरण समोर आले आहे ते भयंकर आहे. मुंबई शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेली जागा, स्थळे, आणि इमारती आहेत. यातील काही ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती पुरातत्व विभागाकडून संरक्षित केल्या जातात. कारण या ऐतहासिक वास्तुंमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडते. पण नवीन घोटाळा समोर आला आहे, त्यात मुंबई शहरातील राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असताना सुध्दा हेरिटेज श्रेणी ३ मधील वास्तू या हेरिटेज कमिटीच्या परवानगीविना मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर तोडण्यासाठी परवानगी दिली आहे, असा आरोप आशिष शेलारांनी केला आहे.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, जगभरात हेरिटेज स्ट्रक्चर वाचविण्यासाठी प्रयत्न होत असताना शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेत हे स्ट्रक्चर तोडण्याच्या परवानग्या बिल्डर्सना जलदगतीने दिल्या जात आहेत. मुंबईत श्रेणी ३मध्ये २५० इमारती आणि स्ट्रक्चर आणि १३ परिसरांमध्ये तोडकाम करण्याची परवानगी आयुक्तांनी परस्पर दिली असून ही कुणाच्या सांगण्यावरुन दिली? पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या वास्तू तोडण्याची परवागनी दिली जातेय याकडे पर्यटनमंत्र्यांचे लक्ष आहे का?मुंबई आमचीच असा कांगावा करणारे आता या विरोधात का बोलत नाहीत?, असे महत्त्वाचे सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केले.
असे परस्पर निर्णय घेऊन यातून बिल्डर्सना ७० हजार कोटींचा फायदा करुन देण्यात येत असून ऐतिहासिक वास्तू तोडून बिल्डरच्या घशात ऐतिहासिक वास्तू आणि जागा घातल्या जात आहेत. या सगळया प्रकरणात आयुक्त कुणाच्या तरी सांगण्यावरुन ही परवानगी देत असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी आशिष शेलारांनी केली.
तर आम्ही थेट न्यायालयात जाऊ; पालिका प्रशासनाला इशारा
शिवसेनेचे नगरसेवक व युवा सेनेच्या एका नेत्याच्या जवळचे असलेले अमेय घोले यांनी हेरिटेज कमिटी परवानग्या देत नाही म्हणून हेरिटेज कमिटीच बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. हे महाभंयकर आहे. वांद्रे बॅडस्टँड येथील सरकारी भूखंडावर असणारे ऐतिहासिक स्ट्रक्चर तोडण्याची परवानगी आयुक्तांनी दिली. त्याचे प्रकरण आम्ही नुकतेच उघड केले आहे. या विषयात मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की त्यांनी आयुक्तांना कायद्याची आठवण करुन द्यावी अन्यथा मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तूंच्या संरक्षणासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा शेलारांनी दिला.
हेरिटेज कमिटी याबाबत स्वत: आयुक्तांनी लिहून कळवते आहे की, एवढी प्रकरणे आमच्या परवानगी शिवाय मंजूर कशी होत आहेत? या कमिटीमधील तज्ज्ञ स्वत: सांगत आहेत की आम्हाला बाजूला ठेवून हे निर्णय घेतले जात आहेत तरीही पालिका आयुक्त ऐकायला तयार नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.