मुंबई - भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. विकास निधी वाटपावरून निशाणा साधला आहे. "मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय?, हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या" असा सवाल करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कमी विकास निधी देण्यात आल्याने भाजपाच्या नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
"650 कोटी विकास निधीपैकी शिवसेना 97 नगरसेवकांना 230 कोटी, भाजपा 83 नगरसेवक 60 कोटी, काँग्रेस 29 नगरसेवक 81 कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्षांना एकट्याला 30 कोटी... मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय? हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या!" असं म्हणत शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. महापालिकेच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मंजूर करताना सातशे कोटी रुपयांचा निधी नगरसेवकांच्या विकासकामांसाठी देण्यात आला. तर सन 2021-22 मध्ये 650 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
... अखेर मुंबई महानगरपालिकेची शोभा व्हायची ती झालीच; आशिष शेलार यांची टीका
उत्पन्नात मोठी घट असताना कोरोना काळात 1600 कोटी रुपये खर्च झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मात्र यावेळेस अंतर्गत निधीतून कर्ज उचलणेही शक्य नसल्यामुळे आता शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभे करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी तीन ते चार हजार कोटी निधीची गरज भागवण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यावरून आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर याआधी जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.
"एकीकडे हेरिटेज वॉक सुरू करुन ऐतिहासिक मुंबई महापालिकेची वास्तू खुली केलीत. दुसरीकडे कर्ज रोखे काढून महापालिकेला 'बाजारात' उभी केलीत. वा! अखेर श्रीमंत महापालिकेची शोभा व्हायची ती झालीच," असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. तसंच नीट काळजी घेताय ना?, कर्ज रोखेच विकताय ना?, 7/12 वर मालक मुंबईकरच राहणार ना? असे सवालही शेलार यांनी केले होते.