मुंबई -भाजपाकडे पहिल्यांदाही मराठी मतं होती, आजही आहेत. ज्यावेळेला शिवसेनेने असा दावा करायला सुरुवात केली की, गणेशोत्सव म्हणजे आम्ही, दहीहंडी म्हणजे आम्ही, त्यांना आता भाजपाने सत्याचा आरसा दाखविला आहे. भाजप सणात कधीही राजकारण आणत नाही. सणात केवळ आम्ही सहभागिता देतो. यावर्षी दहीहंडी असो, वा गणेशोत्सव, त्यात मुंबईतील मंडळाची सहभागिता कुणाच्या बाजूने आहे हे दिसले. असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला.
आशिष शेलार यांनी भारतीय जनता पार्टीने गणेशोत्सव काळात "मुंबईचा मोरया" ही सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा मुंबईत आयोजित केली होती. मुंबई भाजपाने या स्पर्धेची जय्यत तयारी केली होती. मुंबई बँक, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि कोकस विकास आघाडी यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. या स्पर्धेची तुलना आम्हाला करायची नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या स्पर्धेत ८० मंडळे सहभ्रागी झाली. याउलट मुंबई भाजपाने आयोजित केलेल्या स्पर्धेत तब्बल १०२६ मंडळांनी सहभाग घेतला. इतरांपेक्षा भाजपच्या स्पर्धेला दहा पट सहभागिता मिळाली असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने उत्सवांवर घातलेले निर्बंध मागे घेतल्यानंतर जनतेने उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. या स्पर्धेचे विजेते ठरविण्यासाठी ३० तज्ञ गटांची स्थापना करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम फेरीत ६७ मंडळ पात्र झाले. त्यापैकी २१ मंडळाची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या सहा विभागातून समप्रमाणात पारितोषिकाचे वितरण होईल. मुर्तीची सुबकता, सजावट, स्वच्छता आणि सामाजिक संदेश या निकषांवर निष्पक्ष निर्णय घेऊन स्पर्धा समितीने २१ विजेत्यांची निवड केली आहे.
विशेष म्हणजे स्पर्धेच्या ५०० रुपये प्रवेश शुल्कातून जमा झालेले ५ लाख १३ हजार रुपये हे पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत. पारितोषिक सोहळा अतिशय भव्य स्वरुपात २० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादर येथील शिवाजी मंदिर येथे होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी असतील. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे देखील अतिथी म्हणून उपस्थित असतील.
कोकणामध्ये पक्षाने विशेष बस सोडल्या, मोदी ट्रेन सोडली. कोकणी माणसाची पुन्हा एकदा सेवा करण्यासाठी शिवाजी मंदीर येथे कोकणी गाऱ्हाणे गणरायाला घालणार आहोत. दिगंबर नाईक हे मुंबईकरांची भ्रष्टाचारातून, अपप्रवृत्ती आणि असुविधेतून सुटका होवो, म्हणून गणरायाकडे मालवणी भाषेत गाऱ्हाणे घालणार आहोत. तर उत्तरा केळकर, वैशाली सामंत, श्रीकांत नारायण, सोनाली कर्णिक आदी कलावंत गीतसंगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. मुंबईकरांना आवाहन आहे की, ज्यांना शक्य असल्यास त्यांनी व्यक्तिशः सामील व्हावे. या कार्यक्रमाचे फेसबुकवर लाईव्ह केले जाणार आहे. अशी माहिती शेलार यांनी दिली. ३ लाखांचे प्रथम पारितोषीक असून दुस-या क्रमांकासाठी १लाख ५० हजार रुपये तर तृतीयसाठी ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. ११ हजाराची १२ उत्तेजनार्थ देण्यात येणार असून मुर्तीकार आणि परिसर स्वच्छता, देखावा यासाठी ही बक्षिसे देण्यात येणार आहे.