भाजपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या पंचवीस वर्षे सत्ता असलेल्या उबाठाने यासाठी काय केले? असा सवाल विचारला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मुंबईकरांचा उबाठावरचा विश्वास ठरला खोटा, समुद्राला प्रदुषणाच्या लाटांवर लाटा, पालिकेचे कारभारी मोजत बसले, कटकमिशनच्या नोटा!!" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आरेला कागदावर जंगल घोषित करणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमुंबईकरांना याचे उत्तर देतील का?, हेच समुद्राचे दुषित पाणी 8500 कोटी खर्च करुन उबाठा कटकमिशनसाठी गोडे करुन मुंबईकरांना पाजणार होती? मुंबईकर हो... तुम्हाला दुषित पाणी पाजणाऱ्यांना आता पाणी पाजण्याची वेळ जवळ येतेय!" असं म्हणत आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
"◆मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांला प्रदुषणाचा विळखा..◆सागरी जैवविविधतेतील माशांच्या 48 जाती नष्ट..◆मुंबईच्या सागरी वैविध्याचा अभ्यास आजवर का झाला नाही? ◆मुंबई महापालिकेने याचा कधी अभ्यास केला? याची काही आकडेवारी आहे?◆ सन 1947-48 च्या काळात ब्रिटीशांनी इथले किनारे आणि सागरी वैविध्याबद्दल काही नोंदी केल्या होत्या. त्यानंतर, 1970 च्या आसपास काही वैज्ञानिकांनी आपल्या संशोधन केले. मात्र, याव्यतिरिक्त कोणताही अभ्यास झाला नाही, कसे अभ्यासक सांगतात.◆ मुंबईत किनाऱ्यांवर पाथ मुखे म्हणजेच ब्रिटीशांनी पूराचं पाणी समुद्रात सोडण्यासाठी बांधलेल्या वाहिन्या आहेत.या वाहिन्यांमधून पाणी थेट अरबी समुद्रात जातं. यातून बऱ्याचदा सांडपाणीही येतं.◆स्वयंपाकघरातील पाण्यापासून ते स्नानगृह व संडासातील मैल्याबरोबर दररोज अंदाजे 400 कोटी लीटर सांडपाणी मुंबईच्या समुद्रात सोडले जाते. ◆या सांडपाण्यासोबत प्लॅस्टिक, सेंद्रीय पदार्थ, अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू तसेच साबणाचे घटक असतात. ई. कोलाई व व्हिबरियोसारखे रोगकारक बक्टेरिया खाऱ्या पाण्यातही वाढतात आणि त्यातील सेंद्रीय पदार्थांमुळे या जंतूंची वाढ जोमाने होते. ◆समुद्र गढूळसर दिसतो आणि कुजणाऱ्या पदार्थांतून सल्फर डायऑक्साइड व हैड्रोजन सल्फाईड गॅस बाहेर पडून दुर्गंध पसरतो. किनाऱ्याचे पर्यावरण बिघडून जाते.◆ गेल्या पंचवीस वर्षे सत्ता असलेल्या उबाठाने यासाठी काय केले? ◆50 हजार कोटींचा अर्थसंकल्प, 80 हजार कोटी ठेवी असलेली मुंबई महापालिका का सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारु शकले नाही?◆ आरेला कागदावर जंगल घोषित करणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईकरांना याचे उत्तर देतील का?◆ हेच समुद्राचे दुषित पाणी 8500 कोटी खर्च करुन उबाठा कटकमिशनसाठी गोडे करुन मुंबईकरांना पाजणार होती?●●मुंबईकर हो.. तुम्हाला दुषित पाणी पाजणाऱ्यांना आता पाणी पाजण्याची वेळ जवळ येतेय!मुंबईकरांचा उबाठावरचा विश्वास ठरला खोटा, समुद्राला प्रदुषणाच्या लाटांवर लाटा, पालिकेचे कारभारी मोजत बसले, कटकमिशनच्या नोटा!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.