Ashish Shelar : "एक अकेला मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार"; आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:51 PM2023-02-12T15:51:40+5:302023-02-12T15:59:45+5:30
BJP Ashish Shelar : आशिष शेलार यांनी गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला.
हिंदुस्तान देख रहा है एक अकेला सबको भारी पड रहा है राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा एक मोदी सगळ्यांना भारी पडेल असा विश्वास व्यक्त करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आ.अॅड.आशिष शेलार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना समजदारी, सहनशक्ती आणि सेवाकार्य वाढवा असे निर्देश दिले.
शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित, किंचित, माकपा, सपा हे सगळे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भातीने एकत्र आले असून भाजपासोबत होते तेव्हा सन्माननीय नेतृत्व शिवसेनेसोबत होते, मतदार होते आणि आमदार ही होते. भाजपाशी गद्दारी केल्यापासून ना त्यांच्याकडे नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार आहेत. आज मतांसांठी दारोदारी कटोरा घेऊन फिरावे लागते आहे. आपण जनतेच्या सेवेत असून मुंबईकर हे पाहत आहेत.
देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह मुंबईत आले त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेसह एनडीएचे १५० नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि भाजपाचाच महापौर होईल. हा जो संकल्प सोडला आहे तो आपल्याला सर्वांना पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला कामाला लागायचे आहे असे कार्यकर्त्यांना आवाहन करताना आमदार आशिष शेलार यांनी गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला.
गुजरातच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, हा विजय आपल्या विरोधकांना पचणार नाही. अन्याय वाढतील त्यामध्ये पक्षाचे नेतृत्वही असेल व कार्यकर्ताही. याला एकच उत्तर आहे. समजदारी, सहनशक्ती आणि सेवाकार्य आपण करत राहायचे आहे. हाच संदेश घेऊन मुंबईमध्ये आपण सर्वांनी काम करु या. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कणखर नेतृत्व आपल्याकडे आहे त्यामुळे आपण जोमाने कामाला लागु. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
दिपा पाटील यांचा पक्ष प्रवेश
वॉर्ड क्र. १ दहिसर येथील शिवसेना (उबाठा) महिला उपविभाग अध्यक्ष यांच्यासह शाखाप्रमुख गणेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने आज भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"