Thackeray Group Vs BJP: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा ०१ जुलै रोजी निघणारा मोर्चा म्हणजे 'चोर मचाये शोर' असा प्रकार असून स्वतःची पापे लपवण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे. मुंबईकरांचा खरा आक्रोश महायुती ०१ जुलै रोजी मांडणार आहे. या मोर्चात भाजप, शिवसेना (ठाकरे गट), रिपाइंच्या पाठिंब्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मोर्चाला चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. महायुतीतर्फे मुंबईत दोन ठिकाणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. युवा मोर्चा आणि महायुतीच्या घटक पक्षांतर्फे नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालय तर महिला मोर्चा आणि महायुती घटक पक्षांतर्फे दादर स्वामीनारायण मंदिर येथे आक्रोश आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
ठाकरे गटाने २५ वर्षांत मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातला आहे. अक्षरशः लूट केली आहे. तीन लाख कोटींचा हिशोब तुम्ही द्या. कोरोना काळात १२ हजार कोटींचा घोटाळा झाला. भ्रष्टाचार करून आपल्या जवळच्या लोकांना मालामाल करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. त्याची चौकशी तर चालू आहेच. पण आम्ही मुंबईकरांतर्फे हिशोब मागत आहोत. एसआयटीने या प्रकरणाची आतापर्यंत चौकशी का केली नाही याचा जाब विचारण्यात येईल, असे आशिष शेलार म्हणाले.
आदित्य ठाकरे खोटे राजकारण करत आहेत
'चोर मचाये शोर' असा ठाकरे गटाचा मोर्चा आहे. स्वतः केलेला भ्रष्टाचार उघडा पडायला लागला आहे. जवळच्या लोकांची चौकशी होत आहे. यावर पांघरून घालण्यासाठी त्यांचा मोर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारण्याचे काम मुंबईकरांच्यावतीने भारतीय जनता पार्टी करणार आहे, असे सांगत, ठाकरे गटाच्या या आंदोलनाला अजून तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिलेला नाही. त्यांनी उबाठाला झिडकारलेले दिसते. उबाठाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना अजून तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलेले नाही. यातच त्यांची बाजू लंगडी आहे. ईडी आणि एसआयटीपासून लक्ष भटकवण्यासाठी त्यांचा मोर्चा आहे. आदित्य ठाकरे खोटे राजकारण करत आहेत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एसआयटी घोषित केली. म्हणूनच 'लागली मिर्ची निघाला मोर्चा' त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोर्चाची घोषणा झाली. यांना मुंबईकरांशी काहीही घेणे देणे नाही. "माझे कुटुंब माझी जबाबदारी" एवढ्या स्वार्थी हेतूने या मोर्चाचे आयोजन आहे. आमचे आंदोलन मुंबईकरांसाठी आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.