Ashish Shelar vs Uddhav Thackeray: "माझी खुर्ची, माझा परिवार' या पलीकडे पेंग्विनसेनेला अस्तित्व नाही"; आशिष शेलारांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:52 PM2022-09-08T17:52:08+5:302022-09-08T17:53:24+5:30
सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने 'पेंग्विनसेने'ची कोल्हेकुही, असेही शेलार म्हणाले.
Ashish Shelar vs Uddhav Thackeray: "याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होती. ते सांगायचे की, आदित्य ठाकरे आपले भाऊ आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम झाले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला, तर याकूबच्या कबरीचे सौंदर्य, सुशोभिकरण करणं होणार ना? मैदानै, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल, दुरुस्ती संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. तुम्ही २५ वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरी ही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे. पण माझी खुर्ची, माझा परिवार या पलीकडे 'पेंग्विनसेने'ला अस्तित्व नाही, अशी घणाघाती टीका भाजपा आमदार आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. तसेच, 'पेंग्विनसेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ना, मग आता ही कबर उखडून दाखवा', असं चॅलेंजही भाजपाने ठाकरे यांच्या शिवसनेला दिले.
"सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते हे आम्ही पाहिले आहे. सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात गेली तेव्हा मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँबस्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशी दिली?", असा सवालही त्यांनी केला.
"कबरीच्या सुशोभिकरणाचा मुद्दा तुकडे तुकडे गॅंगच्या दबावाखाली मोठा करण्यात आला. 'अफजल तेरे कातील जिंदा है, हम शर्मिंदा है...' असे हे तुकडे तुकडे गॅंग म्हणाले आहेत. नवाब मलिक, अस्लम शेख, आणि तुकडे तुकडे गँगला खूश करण्यासाठी मविआच्या काळात हे करण्यात आले. याकूबला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर याकूबला फाशी देण्यात आली, तेव्हा अस्लम शेखने त्यास विरोध केला होता हे विसरून चालणार नाही", असे म्हणत त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली.
दसर मेळाव्याबाबत सुरू असलेल्या गोंधळावरही त्यांनी आपले मत मांडले. "एका सामान्य शिवसैनिकाला आता मुख्यमंत्रीपद मिळाले त्यामुळे 'पेंग्विनसेने'ची कोल्हेकुही सुरू आहे. जो वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडेल, तोच दसरा मेळावा घेईल. शिवाजी पार्कचे मैदान कुणाला द्यावे, याबाबत नियम नियमावली आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणा निर्णय घेतील. मात्र ज्यांच्याकडे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने आहे, त्यालाच सभा घेता आली पाहिजे", असे सूचक विधान शेलार यांनी केले.