उद्धव ठाकरे य़ांनी "अख्खा भाजपा जरी उभा राहिला तरी मला हरवू शकत नाही. ठाकरे नावाला इतिहास, माझ्यावर टीका करणाऱ्यांना कोणता इतिहास आहे" अशी विचारणा केली. मी फक्त भाजपाला सोडले आहे. हिंदुत्व सोडलेले नाही. भाजपामध्ये राम नाही, आहेत ते फक्त आयाराम. त्या आयारामांना घेऊन सत्ता स्थापन केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोण आला आणि कोण गेला, हे लिहिण्याचे फक्त मस्टर आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
"तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?"; असा खोचक सवाल विचारला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?, आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे. तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका" असं म्हणत निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती!म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले?मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना...त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे...त्यांना सगळा हिशेब देऊच!तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आशिष शेलार यांनी याआधी "लबाड लांडगा ढोंग करतोय" असं म्हणत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "महाराष्ट्राची मागील अडीच वर्षे जी वाया गेली, त्या काळातील कवित्व महाराष्ट्र आजही विसरणार नाहीच... तरीही लक्षात असू द्या...◆ त्या काळात "ते" डॉक्टरांकडून नाही तर कंम्पाऊडरकडून औषधे घेत होते◆कोव्हिडबाबत वैज्ञानिक नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते◆मुंबईत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाणी तुंबत नव्हतेआणि हो.. सगळ्यात महत्त्वाचे जे काल व्हाईट पेपरवर उघड झाले, जे आम्ही सांगत होतोच..◆वेदांता आणि फॉक्सकॉन सोबत कोणताही करार झालाच नव्हता...हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता, तरीही "ते” ‘ प्रकल्प गेला..प्रकल्प गेला’असे गळे काढत होते. म्हणून यांचे एका वाक्यात वर्णन एवढेच!●●लबाड लांडगा ढोंग करतोय!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.