रियाज भाटीला गायब करण्यामागे NCP चा हात?; वाझे प्रकरणात आणखी नावं फुटण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 01:45 PM2021-11-10T13:45:53+5:302021-11-10T13:58:38+5:30
पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान यांच्याशी रियाज भाटीचा संबंध नाही. रियाज भाटीला गायब करण्यामागे राष्ट्रवादीचा हात आहे का? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.
मुंबई – राज्यातील राजकारणात सध्या अंडरवर्ल्डचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत मंत्री नवाब मलिकांनी जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासकट केला. त्यानंतर मलिकांनी फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत रियाज भाटी कोण? असा सवाल केला.
दोन बोगस पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला(Riyaz Bhati) अटक केली होती. त्याला २ दिवसांत सोडण्यात आले. देवेंद्र फडणवीसांसोबत(Devendra Fadnavis) त्यांचे कनेक्शन आहे असा दावा मलिकांनी केला होता. त्यावर भाजपाने रियाज भाटीचे सर्वच राजकीय नेत्यांसोबत फोटो आहे. तसेच हा रियाज भाटी १९९९ ला राष्ट्रवादी स्थापनेपासून ते पक्षाचे पदाधिकारी होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता जनरल सचिव होता असं प्रत्युत्तर दिलं.
रियाज भाटीला गायब करण्यामागे NCP चा हात?
पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान यांच्याशी रियाज भाटीचा संबंध नाही. रियाज भाटीला गायब करण्यामागे राष्ट्रवादीचा हात आहे का? रियाज भाटीचे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतही फोटो आहेत. बड्या नेत्यासोबत फोटो काढले म्हणून त्या नेत्याला वादात ओढण्याचं काम भाजपा करत नाही. रियाज भाटी गायब झालाय की त्याला वाचवलं जात आहे? राष्ट्रवादी काँग्रेस रियाज भाटीला कस्टडीत आणण्यापासून वाचवत आहे. रियाज भाटीचं नाव सचिन वाझे प्रकरणात आलं आहे. त्यामुळे रियाज भाटी मुंबई पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणांसमोर आला तर वसुलीचे आणखी काही नावं फुटतील याची भीती वाटतेय का? असा गंभीर आरोप शेलारांनी केला आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
रियाज भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाज भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी(Nawab Malik) देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.