Ashish Shelar: हॉटेल बदललं म्हणून मनस्थिती बदलत नाहीत: आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:22 PM2022-06-16T18:22:05+5:302022-06-16T18:22:36+5:30
भाजपा व्यक्तीला पाडण्यासाठी निवडणूक लढवत नाही. पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी लढत आहे असं शेलारांनी सांगितले.
मुंबई - राज्यसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडी विशेष खबरदारी घेत आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच पुन्हा पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यात शिवसेना, काँग्रेस, भाजपाने आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. मात्र या राजकीय खेळीवर आशिष शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने काय तयारी केली यावर मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडीचा निकाल राज्यसभेत जसा लागला तसाच विधान परिषदेच्या निवडणुकीत लागेल. हॉटेल बदलल्यावर मनस्थिती बदलते, माणसं बदलतात असं नाही. प्रत्येक पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी लढतो. बिनविरोध निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केला. परंतु कुणाच्यातरी अट्टाहासामुळे ही निवडणूक लादली गेली. भाजपा कुठल्याही आव्हानाला तयार आहे. महाविकास आघाडीचा पराभव निश्चित असून भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यसभा जिंकली, विधान परिषदही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच भाजपा व्यक्तीला पाडण्यासाठी निवडणूक लढवत नाही. पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी लढत आहे. द्वेषापोटी निवडणूक लढवत नाही. सेवक म्हणून निवडून येऊन जनतेचे काम करावं म्हणून निवडणूक भाजपा लढवत आहे. शिवसेनेची B टीम एमआयएम आहे. त्यांची मते राज्यसभेत घेतली. त्यामुळे औरंगाबादेत शिवसेना MIM ची बी टीम आणि मुंबईत MIM शिवसेनेची बी टीम बनेल हे स्पष्ट झाले. मुंबई महापालिकेत शिवसेना-MIM युती झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. भाजपा शतप्रतिशत मुंबई महापालिकेत उतरणार आणि जिंकणार आहे. भाजपा १०० टक्के स्वबळावर महापालिकेत जिंकेल असंही आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान, लोकसभा मतदारसंघाबाबत आज बैठक झाली. विविध मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला. पक्ष जी जबाबदारी देईल ती सांभाळण्यास तयार आहे. प्रत्येकाला २०२४ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली. सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. याठिकाणी भाजपा जिंकेल असा विश्वास आहे असं शेलारांनी सांगितले.
उत्तर देऊ शकत नसल्यानं काँग्रेसचं आंदोलन
काँग्रेसनं ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याऐवजी गांधी कुटुंबावर जे आरोप आहेत त्याचा अभ्यास नेत्यांनी करावा. एक कंपनी बंद होऊन दुसरी बनवली जाते. संपत्ती हस्तांतरीत होते. इतके गंभीर आरोप असताना काँग्रेस नेते आंदोलन करत आहे. कंपनीचा व्यवहार जे समोर येत आहेत. त्यात कुठलाही दुरुपयोग केला याचं स्पष्टीकरण काँग्रेसने द्यावे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही म्हणून हे आंदोलन करत आहे असा टोला आशिष शेलारांनी काँग्रेसला लगावला.