आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न; विरोधकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:48 AM2019-11-08T05:48:40+5:302019-11-08T05:49:19+5:30
आज राज्यपालांना भेटणार
मुंबई : शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसल्यामुळे सत्तास्थापनेची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप नेते काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या संपर्कात असून त्यांना आमिषं दाखवली जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
स्वबळावर सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ भाजपकडे नाही. शिवाय, शिवसेना त्यांना जवळ करण्यास तयार नाही. त्यामुळे ते विरोधकांच्या आमदारांशी संपर्क साधत असून त्यांना नाना आमिषे दाखवली जात आहेत. मात्र, आमचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागणार नाही. सत्तेसाठी घोडेबाजार करणे घटनाबाह्य असून आमच्या आमदारांना संरक्षण देण्याची मागणी आम्ही उद्या राज्यपालांकडे करणार आहोत, असे वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी आमच्या काही आमदारांना आमिषं दाखवली जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार आता फुटणार नाही. जितकी फुटाफूट व्हायची होती ती निवडणुकीच्या आधीच झाली आहे. जे निवडून आले आहेत ते सर्व नवे चेहरे आहेत. जनतेच्या विश्वासाला पूर्ण पात्र ठरेलेले हे सर्वजण आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करू, असेही पाटील यांनी ठणकावले.
सत्तास्थापनेसाठी कोणी घोडेबाजार करत असेल तर आमदारांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यपालांनी घ्यायला हवी. यासाठीच आपण उद्या राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार आहोत. -बाळासाहेब थोरात,
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस