Join us  

Maharashtra Political Crisis: “पवारांचे ठीक आहे, पण ठाकरेंचे शिवप्रेमही वडा आणि थाळी पुरतेच?”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 2:06 PM

Maharashtra Political Crisis: नव्या नौदल चिन्हानिमित्त केलेला छत्रपती शिवरायांचा जयजयकार बहुधा पवार-ठाकरे यांच्या कानावर गेलेला नाही, असा टोला भाजपने लगावला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. याला शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. यातच आता स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या जलावतरणावरून भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 

देशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलावतरण झाले. अशा प्रकारच्या मोठ्या विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचेही अनावरण करण्यात आले. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचे मोदींनी म्हटले. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 

ठाकरेंचे शिवप्रेमही वडा आणि थाळी पुरतेच?

अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोचीत INSविक्रांत नौदलाला सोपवताना नव्या नौदल चिन्हानिमित्त केलेला छत्रपती शिवरायांचा जयजयकार बहुधा पवार-ठाकरे यांच्या कानावर गेलेला नाही. पवारांचे ठीक आहे त्यांचा इतिहास ब्राह्मण द्वेशापूरता मर्यादित आहे,पण ठाकरेंचे शिवप्रेमही वडा आणि थाळी पुरतेच?, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. 

दरम्यान, नौदलाच्या नव्या निशाणावरुन आता सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आले आहे. नव्या निशाणात डाव्या बाजूस तिरंगा आणि उजव्या बाजूस निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनेरी रंगात अशोक चिन्ह साकारण्यात आलेले आहे. त्याखाली संस्कृत भाषेत 'शं नो वरुण:' असे लिहिण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या ऐतिहासिक दिवशी इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. भारताने गुलामगिरीचे ओझे उतरवले आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात डौलाने फडकणार आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळअतुल भातखळकरशरद पवारउद्धव ठाकरे