मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आरे वाचवा असे आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. या आंदोलकांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भेट दिली. मात्र, या आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांना टोला लगावत, शिल्लकसेनेकडे कार्यकर्तेही उरले नाहीत बहुधा, असे म्हटले आहे.
आरेमध्येच कारशेड करण्याच्या निर्णयावर, आमच्यावरील राग मुंबईवर काढू नका, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन केले आहे. हीच री आदित्य ठाकरे यांनीही ओढली आहे. सध्या आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढत पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधण्यासाठी सक्रीय झाले आहेत. आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा वापर होत असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये आले आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
शिल्लक सेनेकडे कार्यकर्ते उरले नाहीत बहुधा
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करणे हे त्यांच्या असंवेदशीलता आणि वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक आहे. शिल्लक सेनेकडे कार्यकर्ते उरले नाहीत बहुधा. आदित्य ठाकरे यांचा तीव्र निषेध, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
ठाकरे सरकार मुंबईच्या हिताचा विचार करणारे होते
महाविकास आघाडीचे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे होते. आम्ही ८०८ एकर जंगल घोषित केले होते. हे करत असताना आदिवासींचे हक्क बाधित ठेवण्यात आले होते. कारशेड आपण कांजूरला नेण्याचा प्रयत्न करत होतो. कारशेड रोज लागत नाही. चार ते पाच महिन्यातून एकदा त्याचा वापर होतो. आधीचे प्लानिंग चुकीचे होते. कांजूरमार्गची जागा मेट्रो ६ ला द्या असे सरकार केंद्राला सांगत आहे. मेट्रो ६ सोबत अनेक मेट्रो लाईन कारशेडविना बांधायला घेतल्या होत्या. आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही, तर इथे अनेक प्राणी येतात. सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात होता. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणे आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले जात आहे. हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचे कारण नव्हते. शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.