मुंबई: एकीकडे राज्यात राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential Election 2022) चुरस पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक जण शिंदे गटात सहभागी होताना दिसत आहेत. यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा द्यावा, यासाठी राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. यानंतर आता आणखी एका आमदाराने अशाच प्रकारची विनंती उद्धव ठाकरे यांना केली आहे. हा शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीसाठी प्रयत्न केल्यानंतर देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यातही सहभाग घेतला होता. अनेक मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळाले. यानंतर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, यातच आता शिवसेनेच्या दोन खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
आणखी किती रांगेत आहेत?
या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. एका ट्विटमध्ये, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यानंतर राजेंद्र गावित यांनीही भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती पक्षप्रमुख ठाकरे यांना केली आहे. आणखी किती रांगेत आहेत???, असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील खासदारांमध्येही चलबिचल असल्याचे दिसत आहे. जवळपास १२ खासदार हे शिंदेंसोबत जातील, असे म्हटले जात आहे. त्यातच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन गट पडण्याची चिन्हे आहेत. शिंदे यांच्यासोबत जाण्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या एकाही खासदाराने आतापर्यंत घेतलेली नाही. मात्र, १२ खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते.