Maharashtra Politics: “शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:59 PM2022-09-20T14:59:25+5:302022-09-20T15:00:15+5:30

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत संजय राऊतांनी बैठका घेतल्याचा दावा भाजप नेते अतुल भातखळकरांनी केला आहे.

bjp atul bhatkhalkar demand to investigate role of ncp chief sharad pawar in patra chawl case | Maharashtra Politics: “शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी”

Maharashtra Politics: “शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी”

Next

Maharashtra Politics: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, यानंतर आता भाजपने पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. 

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र दिले आहे. केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी बैठका घेत होते. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून, त्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.  

कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव 

यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळं या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहे. मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी, असे अतुल भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

 

Web Title: bjp atul bhatkhalkar demand to investigate role of ncp chief sharad pawar in patra chawl case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.