Join us

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 3:34 PM

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर देत, आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, असे म्हटले आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यामध्ये शिवसेना नेतेही मागे नव्हते. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावेळी शिंदे-भाजप सरकारवर बोचरी टीका केली. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा...ईडी सरकार हाय हाय... या  सरकारचं करायचं काय...खाली डोकं वर पाय... आले रे आले ५० खोके आले...खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला. हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या टीकेवर पलटवार करत खोचक टोला लगावला आहे. 

आरशात स्वतःचा चेहरा ही पाहात जा

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. गद्दार, लोकशाहीचा खून... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहरा ही पाहात जा आदित्य ठाकरे..., असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. तसेच आम्ही २०१९ मध्ये सत्तांतर करून देशाला नवा पर्याय दाखवला. दुर्दैवाने आमच्यातील काही जण गद्दार निघाले ज्यांनी एका प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांना मंत्रिपदावर संधी दिली त्यांचंही डिमोशन झालं आहे. आमच्याकडे असताना बरे होते. आता पुन्हा आमचे दरवाजे खुले आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात असेल. परंतु सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले. 

दरम्यान, भाजपकडून मुंबईभर दहिहंडीचे कार्यक्रम करणार आहेत. यावर, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. वरळी सर्वांना आवडली आहे. सगळ्यांनी सण साजरा करावा. कुठेही दहिहंडी साजरी करावी. मात्र कार्यकर्त्यांची मारामारी व्हावी, अशी आमची भूमिका नाही. यावर, आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करावे. जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळअतुल भातखळकरआदित्य ठाकरेआशीष शेलार