Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या नेत्यांना जाहीररित्या संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गट यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिले. यानंतर आता भाजप नेतेही उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरेंनी आधी वांद्र्यात आमदार जिंकून दाखवावा, नंतर उड्या माराव्यात, असे आव्हान भाजपकडून देण्यात आले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी, मी इथे आलो तेव्हा पाहिले, आमचे वडील जागेवर आहेत ना, नाहीतर जशी महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी फिरते, तशीच एक बाप पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे, अशी टीका केली होती. यावर, शिवसैनिक गोंधळले असतील, टाळ्या पिटाव्यात की कपाळ बडवावे, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.
सहाव्या नंबरचा पक्ष आणि दस नंबरी नेता
जनाबसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वांद्र्यात आमदार जिंकून दाखवावा, नंतर उड्या माराव्यात. सहाव्या नंबरचा पक्ष आणि दस नंबरी नेता, अशी खोचक टीका भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे तळपते सूर्य आहेत. पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळा बाहेर पडतच नसल्यामुळे क्वचित कधीतरी ते बाहेर पडतात. सत्तेवर असताना मुलाची बेरोजगारी दूर करण्याचे असामान्य कर्तृत्व त्यांनी गाजवले. राज्य गमावल्यानंतर आता महापालिका गमावण्याच्या धास्तीने सध्या घणाघाती बरळतायत, असा हल्लाबोलही भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. फडणवीसांची शेवटची निवडणूक असंही ते म्हणाले. तुम्ही २०१९ ला माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत आणि यापुढेही संपवू शकणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.