मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. मात्र, यातच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावरून महाविकास आघाडीतून टीका होऊ लागली आहे. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेवर पलटवार करण्यात येत आहे. सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट आणि बापाच्या नावाने थापा, या शब्दांत भाजपकडून प्रतुत्तर देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून शिवसैनिकांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, अमित शाहांवर पुन्हा तोफ डागली. पाकिस्तानमधील माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे.
सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट...
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट... बापाच्या नावाने थापा. अरे हाच खरा थापा आहे... पण त्या आधी वाफा आहे.. कोण बोलतेय, उद्धव ठाकरे की राहुल गांधी? तीच बिनडोक भाषा..., असा खोचक टोला लगावला. तसेच दसरा मेळाव्यात बोलताना, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन हिंदुत्व व्यापक केले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते, यावर शिल्लक सेनेच्या सरबरीत हिंदुत्वाचे गुपित अखेर उघड झाल्याचे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
काँग्रेसचे जोडे उचलताना त्यांनाही विचारा कधी तरी हा प्रश्न
आठ वर्षात POK ची एकही फूट जमीन घेतली नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावर, उद्धव ठाकरे, अहो ते टक्केवारी घेण्याइतके सोपे आहे का? ज्यांच्यामुळे देश खंडित झाला पाकिस्तानची निर्मिती झाली, POK अस्तित्वात आला. त्या काँग्रेसचे जोडे उचलताना त्यांनाही विचारा कधी तरी हा प्रश्न, असा पलटवार अतुल भातखळकर यांनी केला. तसेच अमित शाहांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना, अडीच वर्षे घरात दडी मारून, कडी लावून बसलेल्याला घरगुती मंत्री म्हणतात..., असा टोलाही भातखळकर यांनी लगावला. याशिवाय, शोलेमध्ये जर जगदिपला सूर्मा भोपाली ऐवजी जय, वीरू किंवा ठाकूरचा रोल मिळाला असता तर काय झाले असते??? का कोण जाणे, पण दर वेळी जनाब भाषण ठोकून गेले की हा प्रश्न माझ्या मनात येतोच..., अशी टीका करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"