Join us

Maharashtra Political Crisis: “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओत फोटो काढत बसावे लागले असते”; भाजपची ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 2:04 PM

Maharashtra Political Crisis: सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे.

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई आणि आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली होती. यानंतर शिवसेनेने अमित शाह यांच्यावर रोखठोक शब्दांत पलटवार केला. याला आता पुन्हा भाजपकडून बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

एका तडीपार गुंडाचे ऐकेल एवढा महाराष्ट्र दुबळा नाही, अशी टीका शिवसेनेकडून अमित शाह यांच्यावर करण्यात आली होती. तसेच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. आतापर्यंत बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे मला जरा जपूनच बोलावे लागायचे. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचेय ते मी बोलेन, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. 

एखाद्या स्टुडिओत फोटो काढत बसावे लागले असते

अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, सत्ता गमावल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओ मध्ये फोटो काढत बसावे लागले असते, अशी बोचरी टीका भातखळकर यांनी केली आहे. तसेच असेही फाजील बकवास करण्यासाठी आपला लौकिक आहे. मास्क असो व नसो जे काही बोलाल ते मेंदूच्या जेमतेम क्षमतेनुसारच, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी दुसऱ्या एका ट्विटमधून केला आहे. एकंदरीतच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या वाहतूक सेनेकडून नवीन सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली. काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे ११ हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रे जमा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत. जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नाही. सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे, असे उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना सांगितले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळअतुल भातखळकरउद्धव ठाकरेशिवसेनाअमित शाहभाजपा