Maharashtra Politics: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri Bypoll 2022) पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, अद्यापही सहा उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक होणारच आहे. यातच माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. या टीकेचा भाजपकडूनही खरपूस समाचार घेतला जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, तुरुंगात गेल्यापासून संजय राऊतांनी सामना वाचणे बंद केले आहे बहुधा, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे 'स्क्रिप्ट'चाच भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता. त्यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला. अंधेरी पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपने या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊतांनी सामना वाचणे बंद केले आहे बहुधा
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. तुरुंगात गेल्यापासून संजय राऊत यांनी सामना वाचणे बंद केले आहे बहुधा. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा वारसा दाखवल्याबद्दल शरद पवार यांचे कौतुक केले आहे. ठाकरेंच्या सामनातील निवेदनात कुठेही मैदानात उतरण्याची भाषा नाही. त्यामुळे राऊत, अंधारे काय बरळतात त्याला काय किंमत आहे?, अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक आम्ही १०० टक्के जिंकणार होतो. पण यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी जेव्हा कुणा लोकप्रतिनिधीचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी रिंगणात उतरले असेल, तर भाजप उमेदवार देत नाही, ही आमची संस्कृती आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयानंतर स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"