मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आरे वाचवा असे आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. यातच आता मुंबई मेट्रोचे काम मार्गी लावण्यासाठी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तत्पूर्वी, या आंदोलनासाठी आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. यावरून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून आदित्य ठाकरे आणि इतर संबंधितांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी करूत गुन्हे दाखल करावेत, असे आयोगाने म्हटले आहे.
कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी
अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये, कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे. अश्विनी भिडे यांची नियुक्ती पुरेशी बोलकी आहे, असे म्हटले आहे. यापूर्वी, आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत, असा टोला लगावला आहे. तसेच याच प्रकरणावरून भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करणे हे त्यांच्या असंवेदशीलता आणि वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक आहे. शिल्लक सेनेकडे कार्यकर्ते उरले नाहीत बहुधा. आदित्य ठाकरे यांचा तीव्र निषेध, अशी टीका केली होती.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो; मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अश्विनी भिडे यांनी दीर्घकाळ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालकपद यशस्वीरीत्या सांभाळले आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यात आली. आता त्या मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असलेले एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडून पदभार स्वीकारतील.