Join us

"...म्हणून तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 4:37 PM

BJP Atul Bhatkhalkar Slams Punjab CM Amrinder Singh : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे

मुंबई - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Punjab CM Amrinder Singh) यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच "शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन  करावं, पण पंजाबमध्ये नको" असा सल्ला देखील त्यांनी केला आहे. "पंजाब सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणं टाळावं" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. होशियारपूरच्या चब्बेवाल विधानसभा क्षेत्रातील मुखलियाना गावात 13.44 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या शासकीय महाविद्यालयाच्या पायभरणी कार्यक्रमावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून भाजपाने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"पंजाबमध्ये आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव" असल्याचं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचा दिला सल्ला दिला आहे. किसान आंदोलन हे काँग्रेस पुरस्कृत देशव्यापी अराजक माजविण्याचे षड्यंत्र आहे, त्याचा हा पुरावा. पंजाबात सत्ता असल्यामुळे तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव" असं आपल्या ट्विटमध्ये भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

"शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पण पंजाबमध्ये नको कारण..."; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

अमरिंदर सिंग यांनी "पंजाबमध्ये 113 ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन राज्याच्या हिताचं नाही. यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरित परिणाम होतं आहे. दिल्ली आणि हरियाणात आंदोलन करणं योग्य आहे. पण पंजाबमध्ये 113 ठिकाणी धरणं धरून बसण्याचा आणि पंजाबची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा काही उपयोग नाही" असं म्हटलं आहे. तसेच "शेतकरी आपलं म्हणणं ऐकतील. कारण कायदे विधासभेत रद्द केले आहेत. त्या ठिकाणी राज्य सरकारने आपले कृषी कायदे पास केले आहेत. कायदे मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवले आहेत. मात्र दुर्दैवाने त्यांनी राष्ट्रपतींकडे अजूनही पाठवले नाहीत" असंही म्हटलं आहे.

"जे काही आमच्या सरकारच्या हातात आहे, ते आम्ही प्राधान्याने केलं आहे. अलीकडेच चंदिगडमध्ये शेतकरी संघटनेचे नेते भेटले. त्यांनी उसाची किंमत 325 रुपयांवरून 360 रुपये क्विंटल करण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी त्याचवेळी मान्य केली. राज्यात आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे जेणेकरून हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करता येतील" असं देखील पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :अतुल भातखळकरपंजाबभाजपाकाँग्रेसराजकारणभारतशेतकरी आंदोलन