मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज (BJP Mohit Kamboj) यांच्या कारवर शुक्रवारी मातोश्रीबाहेर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. भाजपा नेते आक्रमक झाले असून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. याच दरम्यान "सत्ता गमावण्याच्या भीतीने गारठलेली शिवसेना आता भ्याड हल्ल्यावर उतरलेली आहे" असं म्हणत पुन्हा एकदा भाजपाने टीका केली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"सत्ता गमावण्याच्या भीतीने गारठलेली शिवसेना आता भ्याड हल्ल्यावर उतरलेली आहे. मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला हा त्याच भीरू मानसिकतेचे लक्षण आहे. असे हल्ले भाजपाला रोखू शकतील या भ्रमातून उद्धव ठाकरे यांनी लवकरच बाहेर यावं" असं म्हणत भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला हा उन्माद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
''मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण, तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही. आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार?, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच. या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे" असेही ते म्हणाले.
मुंबईत विरोधी पक्षातील नेते जे भ्रष्टाचार उघडकीस आणतात, त्यांच्यावर अशाप्रकारे होत असेलला हल्ला निंदनीय आहे. मला वाटतंय, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, मुंबई पोलिसांनी याचा तपास करावा. मुंबई पोलिसांनी डोकं चालवून मला मॉबपासून वाचवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. मात्र, ठाकरे सरकार अशाप्रकारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही घाबरणार नाहीत, आमची लढाई यापुढेही सुरूच राहिल, हम झुकेंगे नही... अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी हल्ल्यांनंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.