मुंबई: केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्षपद घ्यावे यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. यावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारही उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्तावरुन वादंग सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुन आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून यावर भाष्य करत टोलेबाजी केली आहे.
उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती. उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला, असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते, असे या ठरावात म्हटले आहे. या ठरावानंतर आता काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.