Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीति आखल्याचेही बोलले जात आहे. यातच आता दसरा मेळाव्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार?
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, यात दसरा मेळाव्याबाबत खोचक टोला लगावला आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे? दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार? असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, शिवसेनेला महापालिका का मैदान देत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, खरी शिवसेना असलेल्या शिंदे गटालाच दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही डुप्लिकेट असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवरही सडकून टीका केली. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. दसरा मेळाव्यासाठी सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखसोबत असल्याने आत्मविश्वास दुणावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.तसेच शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले.