Maharashtra Political Crisis: आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या शिंदे-भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपने त्यांना खोचक टोला लगावत, वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्काला उधाण आले आहे. अंबादास दानवे यांच्या कामाचे कौतुक करतानाच भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे मानले जाते. राज्यातील सत्तांतर आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यादांच विधान भवनात आले. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. महाविकास आघाडी भक्कम असल्याची ग्वाही देतानाच त्यांनी विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संदर्भात एक वक्तव्य करत सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे. यावरूनच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी वेगळीच शंका उपस्थित करत, टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर डोळा आहे की काय?
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही इति उद्धव ठाकरे. म्हणजे आता उद्धावजींचा विधान परिषदेच्या पक्षनेते पदावर डोळा आहे की काय?, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
दरम्यान, शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर विधिमंडळात झळकवण्यात आले. तसेच सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे घराण्यावर निशाणा साधण्यात आला. सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ५० खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.