मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्या सुनयना होले विरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सदर महिलेला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र या महिलेला जामीन मिळावा म्हणून दिल्ली भाजपाचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून भाजपा युवा मोर्चाचे देवांग दवे यांनी मदत केल्याचेही समोर आले आहे.
गेले काही दिवस ट्विटरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका टिप्पणी केली जात होती. तर उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून मौलवी झाल्याचे दाखवण्यात आला आहे. या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप अॅड. धरम मिश्रा यांनी केला होता. यानंतर प्रकरणातील महिलेला अटक झाली असून तिला जामीनावर सोडण्यात आलं आहे. सायबर विभाग ट्विटर अकाउंट मॉनिटर करत आहे आणि अकाउंटची पडताळणी करून सायबर विभागाकडून पुढील तपास करत आहे. मात्र सुनयना होले यांना जामीन मिळण्यामागे भाजपाचं कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.
तजिंदर पाल बग्गा यांनी ट्विट करुन देवांग दवे यांना सुनयना होले प्रकरणात लक्ष घालण्यात सांगितले. यानंतर देवांग दवे यांनी ट्विट करुन संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे, अशं सांगितले. तसेच सुनयना होले यांना जामीनही मंजूर झाला असल्याचे ट्विट देवांग दवे यांनी केले आहे. त्यामुळे भाजपाच्या या दोन नेत्यांच्या ट्विटमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिण्यामागे भाजपाचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत युती तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्या घटनाक्रमापासून ते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापर्यंत सर्व प्रसंगांवर टीका टिप्पणी पोस्टमधून केली जात होती. काही पोस्टमध्ये तर अतिशय खालच्या भाषेचा वापर केला गेला होता तर काहींमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख सुद्धा केला गेला. याच्या विरोधात शिवसैनिकांनमध्ये तीव्र नाराजी होती आणि त्याचे प्रतिसादही उमटत होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण बरंच तापलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून त्यावर विरोधी पक्षाकडून शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यात आदित्य ठाकरे यांचेही नाव ओढण्यात आले आहे. याप्रकरणी आदित्य यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधकांच्या आरोपांची मालिका सुरूच आहे. बिहार सरकारच्या शिफारशीवरून आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. आजच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सीबीआयचा तपास सुरू झाला आहे. दुसरीकडे ईडीकडूनही याप्रकरणी तपास सुरू आहे. त्यामुळे लगेचच हे प्रकरण निवळण्याची शक्यता नाही.