भाजपाने फुंकले आगामी निवडणुकांचे रणशिंग; खासदार गोपाळ शेट्टी यांची स्पष्टोक्ती
By मनोहर कुंभेजकर | Published: May 31, 2023 03:47 PM2023-05-31T15:47:44+5:302023-05-31T15:48:05+5:30
उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखाच पत्रकारां समोर मांडला.
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाची माहिती प्रसिद्धी माध्यमामांना देण्यासाठी बोरीवलीचे आमदार आणि मोदी@9 मुंबई भाजप संयोजक सुनील राणे यांनी आज बोरिवली पश्चिम शिंपोली येथील गोखले शाळेच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखाच पत्रकारां समोर मांडला.
सदर पत्रकार परिषदेचे आयोजन म्हणजे आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीची तयारी असून भाजपाने या निवडणुकांचे रणशिंग फुंकले असे लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांना विचारले असता,निश्चितच आगामी निवडणुकांची ही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात जर चांगली काम करणारी माणसे असतील तर चांगला विकास होवू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती आम्ही उत्तर मुंबईतील सर्व नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून पोहचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.उत्तर मुंबई नेहमीच भाजपाचा गड राहिलेला असून एक खासदार,6 आमदार,24 माजी नगरसेवक आमच्याकडे आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी आमदार सुनील राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाची माहिती आम्ही मुंबईकरां पर्यंत पोहचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार योगेश सागर,आमदार मनीषा चौधरी,उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर,मुंबई भाजप सचिव विनोद शेलार व अँड.ज्ञानमूर्ती शर्मा, दिलीप पंडीत, बाबा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
2024 ला हार्बर लोकल बोरिवली पर्यंत धावणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते गोरेगाव पर्यंत धावणारी हार्बर लोकल 2024 मध्ये बोरिवली पर्यंत धावेल. उद्या आपली या संदर्भात रेल्वे बोर्डा सोबत बैठक असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. तसेच दरवर्षी रेल्वे अपघातात 300 नागरिक मरण पावतात. यासाठी रेल्वेत उघड बंद दरवाजे करावेत अशी मागणी आपण 2014 मध्ये केली होती,त्याला 2022 मध्ये मुहूर्तस्वरूप आले.पुढच्या वर्षी रेल्वे गाड्या उघडं बंद डब्याच्या असतील अशी माहिती त्यानी दिली.
पहिल्या माळ्यावरील झोपडपट्टी वासीयांना घरे मिळण्यासाठी आपण गेली अनेक वर्षे प्रयत्न करत असून झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे या योजनेला खिळ बसली.मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आपल्या मागणीला निश्चित मुहूर्त स्वरुप देतील असे त्यांनी स्पष्ट केले.