मुंबई : राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा ५ फेब्रुवारीला भाजपचे कार्यकर्ते राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत जाहीर केले.कोरोना काळात जनतेला वीज बिलमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार असंवेदनशील आहे. आम्ही या सरकारला मनमानी करू देणार नाही. भाजपचे कार्यकर्ते ५ फेब्रुवारीला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. तसेच वीजपुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. आमचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीजजोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहिल्या होत्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठीण आहे, असा सवालही बावनकुळे यांनी केला. सरकारला का कठीण आहे?फडणवीस सरकारच्या काळात वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. साडेसात लाख वीजजोडण्या दिल्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठीण आहे, असा सवालही बावनकुळे यांनी केला
महावितरण कार्यालयांना भाजप ठोकणार टाळे; ५ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 6:33 AM