Join us

घाटकोपरमध्ये भाजपचे उमेदवार ठरता ठरेना! दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:17 AM

विद्यमान आमदार राम कदम यांचा पत्ता कापला जाणार असल्याची चर्चा

मुंबई : घाटकोपर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार कोण असतील, असा प्रश्न येथील कार्यकर्त्यांना पडला आहे. पश्चिमेकडील विद्यमान आमदार राम कदम यांचा पत्ता कापला जाणार असल्याची, तर पूर्वेकडे आमदार पराग शहा यांच्याऐवजी माजी मंत्री प्रकाश मेहता यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे गड मानले जातात. 

स्थानिक पातळीवर भाजपचा भाजपचा कोणताही नेता किंवा पदाधिकारी सध्या येथील उमेदवाराबाबत ठाम वक्तव्य करण्यास किंवा अंदाज बांधण्यास तयार नाही. दिल्लीहून निर्णय झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली आहे. २०१९ मध्ये तत्कालीन आमदार मेहता यांचे तिकीट कापून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी मेहता यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. अखेर मेहता यांनाच कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागली होती. शहा यांनीही मेहता यांच्याशी जुळवून घेतल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यावेळेस मात्र मेहता उमेदवारीसाठी आग्रही असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मेहता यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग येथे आहे. निवडणूक लढविण्याचे त्यांनी निश्चित केल्याचे समजते.

राम कदम यांचे काय? 

सगळ्यात धक्कादायक चर्चा सुरू झाली आहे ती घाटकोपर पश्चिमेकडील आमदार राम कदम यांच्या उमेदवारीबद्दल. दहीहंडी, ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र दर्शन या उपक्रमांमुळे कदम लोकप्रिय आहेत. कदम यांना का डावलले जाऊ शकते याविषयी कुणालाही ठोस कारण देता येत नाही. कदम यांना डावलले तर त्यांच्या जागी दुसरा कोणता तगडा उमेदवार भाजपकडे आहे, हेही अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र भाजपमध्ये धक्कातंत्राचा वापर केला जात असल्याने काहीही होऊ शकते, असे कार्यकर्त्यांना वाटते. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकभाजपाराम कदमघाटकोपर