“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:26 PM2024-05-10T12:26:33+5:302024-05-10T12:29:43+5:30
Piyush Goyal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली आणि प्रतिष्ठित राष्ट्र म्हणून पुढे जात आहे, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
Piyush Goyal News: उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल मतदारसंघात सर्व ठिकाणी फिरून जोरदार प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पीयूष गोयल यांनी मिलिंद देवरा यांच्यासोबत वांद्रे ते कांदिवली लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला. या प्रवासात जनतेशी विविध मुद्द्यांवर आणि येणार्या निवडणुकांबाबत दोघांनी चर्चा केली. एका कार्यक्रमात बोलताना पीयूष गोयल यांनी हिरे व्यापाराबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे हिरे उद्योगाला लक्षणीय चालना मिळेल. यामुळे हिऱ्याच्या जागतिक बाजारपेठेतील भारताच्या उलाढालीचा सहभागही वाढू शकेल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
या उद्योगावर अवलंबून असलेल्या कारागीरांचे भविष्य समृद्ध असेल
जागतिक हिरे बाजारपेठेमध्ये भारताला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वसमावेशक योजना आहे. हिऱ्यांना पैलू पाडणे, हिऱ्यांना पॉलिश करणे या उद्योगामध्ये भारताचे वर्चस्व आहे. या उद्योगाचा ९५ टक्के वाटा भारताचा आहे. या उद्योगातील कारागीरांसमोर असलेल्या समस्यांची नरेंद्र मोदींना जाणीव असून या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यामुळे या उद्योगावर अवलंबून असलेल्या कारागीरांचे भविष्य समृद्ध असेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अर्थव्यवस्थेला चालना देण्याबरोबरच नागरिकांना, विशेषतः महिलांचे सक्षमीकरण करण्याचे भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली आणि प्रतिष्ठित राष्ट्र म्हणून पुढे जात आहे, असेही गोयल यावेळी म्हणाले.