मुंबई: आताच्या घडीला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून (Andheri Bypoll) जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता दुहेरी संकट उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला असून, प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच गळाला लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातच आता भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर मोठे आरोप केले आहेत. ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाचा मोठा दबाव असून, त्यांचा राजीनामा मुद्दामहून रखडवला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाने दिली. मात्र, यातच आता मुरजी पटेल यांनी सूचक विधान करत या घडामोडींना पुन्हा एकदा ट्विस्ट दिल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाने सांगितल्यास निवडणुकीतून माघार घेणार
भाजपचे जवळपास निश्चित असलेले उमेदवार मुरजी पटेल यांनी, पक्षाने सांगितल्यास निवडणुकीतून माघार घेऊ, असे म्हटले आहे. मुरजी पटेल यांचा मोठा मतदार या मतदारसंघात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप आता बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी अंधेरी पूर्वची जागा सोडणार का, यावरून राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पहिला संघर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही ठाकरे आणि शिंदे गटातच लढली जाईल. निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपने दाखवलेला दावा सोडल्यात जमा असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते की आणखी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"