भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात? ती चाल खेळत ठाकरे गटानं वाढवलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 01:51 PM2022-10-15T13:51:46+5:302022-10-15T13:52:22+5:30
Andheri East Assembly By Election : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाकडून रिंगणात उतरलेले मुरजी पटेल यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाकडून रिंगणात उतरलेले मुरजी पटेल यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्याची तयारी सुरू केली असून, ठाकरे गट पटेल यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे देणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने घेतलेल्या आक्षेपामध्ये तथ्य आढळल्यास मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटाकडून माजी नगरसेवक संदीप नाईक हे मुरजी पटेल यांच्या उमेदवारीविरोधात आक्षेप घेणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुरजी पटेल यांच्याविरोधातील पुरावे निवडणूक आयोगाकडे सोपवले जातील, त्यामुळे भाजपा आणि ठाकरे गट आता मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरून आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लटके यांनी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी दिलेला मुंबई महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा पालिका प्रशासनाने रखडवून ठेवला होता. त्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपा आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. आता त्याचा वचपा ठाकरे गटाकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन काढण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या पक्षांनी मोठं शक्तिप्रदर्शनही केलं. अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ७ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.