Join us

“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 12:51 PM

BJP Piyush Goyal News: उत्तर मुंबईचे भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आवर्जून उपस्थित होते.

BJP Piyush Goyal News: भाजपाकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी पीयूष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भाजपाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पीयूष गोयल यांनी सहकुटुंब बोरिवली पूर्व येथील पुष्टिपती गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पीयूष गोयल यांनी वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन, असे आश्वासन दिले.

महायुतीने शक्तिप्रदर्शन करताना आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. तसेच पीयूष गोयल यांनी अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी यांसह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना पियूष गोयल म्हणाले की, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमत होते. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून भारावून गेलो आहे. जनतेचा उत्साह, प्रेम, स्नेह, आशिर्वाद, शुभेच्छा मिळत आहेत. उत्तर मुंबईतील सर्व रहिवाशांचा सदैव कृतज्ञ राहीन आणि वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन, असे आश्वासन पीयूष गोयल यांनी दिले. 

काँग्रेस हताश आणि नेतृत्वहीन पक्ष

काँग्रेस पक्ष हताश, नेतृत्वहीन आहे. नियत नाही आणि नेताही नाही. काँग्रेस अपयशी पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकसित करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे उत्तर मुंबईचा विकास करण्यासाठी आम्ही भरपूर काम करू. एक हजार खाटांचे सर्वांत मोठे खासगी रुग्णालय मागाठाणे येथे होणार आहे. त्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात चारशे खाटा आणि त्यानंतर हजार खाटांपर्यंत ही संख्या नेण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी अंदाजित खर्च ६ हजार कोटी रुपये आहे. उत्तर मुंबईसाठी हे रुग्णालय अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरायच्या आधीच हे काम आम्ही केले, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पीयूष गोयल मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकतील. आम्ही तिसऱ्यांदा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी जिंकण्याचा पराक्रम करू. मला विश्वास आहे की, उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा पियूष गोयल यांचा संकल्प साकार होईल, असा विश्वास भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मुंबई उत्तरपीयुष गोयलमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४