Ujjwal Nikam News: आमच्या भागातील निवडणूक माझ्या दृष्टिने जरी नवीन असली, तरी भाजपासह युतीचे आमदार यांच्यासह सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की, माझा राजकारणातील जन्म चार-पाच दिवसांचा असताना, विरोधकांकडून जे काही बोलले जाते, यावरून माझ्या उमेदवारीचा त्यांनी धसका घेतला आहे. एवढे मात्र अनुमान काढू शकतो, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपाने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधकांच्या आरोपांना थेट उत्तर दिली. उमेदवारी अर्ज भरताना जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. असा प्रतिसाद मला वकिली व्यवसायातही मिळाला नाही. उमेदवारी अर्ज भरायच्या आधी जी रॅली झाली, त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सहभागी झाली. दोघांनी मला शुभेच्छा दिल्या, असे उज्ज्वल निकम म्हणाले.
मी काय केले आहे, हे जनतेसमोर आहे
मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला कारागृहात बिर्याणी मिळाल्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. अशा आरोपांकडे मी अजिबात लक्ष देत नाही. ही जनता २० मे रोजी या आरोपांना चोखपणे उत्तर देईल. कारण अशा आरोपांना उत्तर देऊन माझी शक्ती खर्च करायची नाही. मी काय केले आहे, हे जनतेसमोर आहे. अशा आरोपांना उत्तर देऊन ताकद खर्च करण्यापेक्षा मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. तुम्ही बघा की यापुढे काय होते, असे उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिले.
माझ्या दृष्टीने महत्त्वाचे एवढेच आहे की...
तुमच्यासमोर मुरलेले राजकारणी निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक तुम्हाला जड जाणार, असे वाटते का, असा प्रश्न उज्ज्वल निकम यांना करण्यात आला. मी अनेक कुविख्यात गुन्हेगार, देशविरोधात युद्ध करण्याचे कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी यांच्याविरोधातही खटले चालवले आहेत. माझ्या विरोधात कोण उभे राहते, हे माझ्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे नाही. माझ्या दृष्टीने महत्त्वाचे एवढेच आहे की, आमचा पक्ष भाजपा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह तसेच मोदी सरकारने सामान्य जनतेसाठी जी काही चांगली कामे केली आहेत, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा जो दबदबा निर्माण झालेला आहे, भारत आर्थिक महसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, हेच मी लोकांना पटवून देईन. वकिली युक्तिवादातून भाजपा आपल्याला का हवी आहे, ते जनतेला पटवून देईन, आपल्याला मोदी सरकार का हवे आहे, याच प्रायोरिटी माझ्यासमोर आहेत, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.