Join us  

“विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”; आव्हाडांचे पाटलांना खुले चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:40 PM

Winter Session Maharashtra 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून जितेंद्र आव्हाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

मुंबई: आताच्या घडीला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session Maharashtra 2021) मुंबईत सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांना काही बोललेलो नाही. तसे असेल तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. 

झाले असे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहिल्याबाबत भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीसारखा बहुतेक आपल्या मुलावरही विश्वास नसेल, अशी टीका केली होती. याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाने मागण्या करणे, आंदोलन करणे, टीका करणे हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणे हे राजकीय प्रगल्भता नसल्याचे उदाहरण आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणे किंवा चर्चा करणे चुकीचे आहे. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणे हेच मुळात विकृतपणाचे आणि बालिशपणाचे लक्षण आहे, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. 

जितेंद्र आव्हाडांची संस्कृतीच दुसऱ्यांचा बाप काढण्याची

जितेंद्र आव्हाडांची संस्कृतीच दुसऱ्यांचा बाप काढण्याची आहे. माझ्या बापाने निवडणूक लढवली नाही. निवडणूक लढवणारा प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बांधिल असतो. माझा बाप एका मिलमध्ये कामगार होता. अपघात झाल्यानंतर ११ महिने ते बेडवर होते. बरे झाल्यानंतर पुन्हा ते मिलमध्ये गेले आणि त्यावेळी ते स्वतःची नोंद कामगार म्हणून करत होते. जर उद्धव ठाकरेंना ते बाप मानत असतील आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या बापाने या फंद्यात पडायला नको होते, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेबाबत जितेंद्र आव्हाड यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. जे काही बोलले ते रेकॉर्डवर आहे. यातील एकही वाक्य बोललो असेन तर दोघांचे म्हणणे तपासून पाहा. एक टक्का जरी चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले असेल तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन. खोटे नाही बोलायचे, महाराष्ट्राला वेडे बनवायचे नाही, असे आव्हाड जितेंद्र आव्हाड यांनी दिले. ते एबीपी माझाशी बोलत होते.  

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनजितेंद्र आव्हाडचंद्रकांत पाटीलउद्धव ठाकरेमहाविकास आघाडी