मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून दिलेल्या पक्षादेशावरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्या सरकारवर टीका केली आहे. नवीन मुख्यमंत्री शिवेसेनेचा नाही. हेच करायचे होते, मग २०१९ मध्येच का नाही केले, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. मात्र, यावेळी अमित शाहांसोबतच्या कलहामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद नाकारले का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला.
आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती
आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो, अशा लोकांनी तयार केलेली ही कथा आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच देशात सध्या दोन विचारधारा आहे. यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारा एक आहे. हिंदुत्वाचे विचार मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या-त्या वेळी भाजपासोबत युती केली. २०१९ पर्यंत ही युती कायम होती. पण त्यानंतर हिंदुत्व मागे पडलं आणि खुर्ची पुढे आली. विश्वासघात झाला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. जे कधी हिंदुत्व मानत नाही, त्यांचा कधी हिंदुत्वाचा एजेंडा देखील नव्हता, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसले. सुरुवातीला त्यांनी महाशिवआघाडी नाव ठेवले होते. त्याचे महाविकास आघाडी कधी झाले कळलेही नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, ज्याप्रकारे हे सरकार स्थापन झाले, ज्याने सरकार स्थापन केले त्याच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. पण मी हेच अडीच वर्षापूर्वी सांगितले होते. माझे आणि अमित शाहांचे ठरले होते. शिवसेना-भाजपने अडीच अडीच वर्षांचा काळ वाटून घ्यावा. पहिल्या अडीच वर्षांत दोघांपैकी एकाचा मुख्यमंत्री झाला असता. मग त्यावेळेला नकार देऊन आता हे का केले हे माझ्यासह राज्यातील जनतेला प्रश्न पडला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.