Chandrakant Patil vs Shivsena : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. यावेळी महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच, महाविकास आघाडीची दानत नसल्यास शिवसेनेने एक काम करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
प्रदेश कार्यालयातून मंत्रालयाकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविल्यानंतर पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात तसेच ओबीसींना परत राजकीय आरक्षण देण्याच्या घोषणा दिल्या. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले. "न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली असली, तरी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या स्तरावर २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊन हे आरक्षण लागू करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची दानत नसेल, तर किमान शिवसेनेने येणाऱ्या निवडणुकीत भाजपाप्रमाणे २७ टक्के तिकिटे ओबीसींना द्यावीत", असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले. "महाविकास आघाडीच्या नाकर्त्या सरकारने राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले. या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळे ते या विषयाचा अभ्यास करत नाहीत आणि मार्गही काढत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले आव्हान आहे की त्यांनी एकदा जाहीरपणे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीची तिहेरी चाचणी काय आहे? एंपिरिकल डेटा गोळा कसा करायचा? हे सांगावे. महानगरपालिकांच्या वॉर्डांची महिला आरक्षणाची सोडत ३१ मे रोजी पूर्ण झाली की त्यानंतर एम्पिरिकल डेटा गोळा केला आणि न्यायालयाने तो स्वीकारला तरी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणे अवघड होईल. त्यामुळे आघाडी सरकार डेटाबाबत फसवणूक करत आहे", असा आरोप त्यांनी केला.