मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरूनही हटवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकनाथ शिंदे यांना भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज जे चित्र शिवसेनेत दिसत आहे, ते उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसू शकेल, असे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
भाजपची आणि एकनाथ शिंदेंची चर्चा नाही, कुठलीही पूर्व योजना नाही, एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला, त्याचे पुढे काय होईल?, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
समझने वालो को इशारा काफी हैं!
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, ते घाईचे होईल. त्यामुळे भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, असे सांगत अडीच वर्षांपूर्वी अनैसर्गिकरित्या सरकार तयार झाले. तेव्हाच काही शिवसेनेचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचे नव्हते. भाजपला धडा शिकवण्यासाठी उचलेले हे पाऊल आहे. असे सांगून त्यांना शांत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केल्याची अनेक भाषणे आहेत. त्यामुळे हे सरकार अनेक नेत्यांना मान्यच नव्हते. त्यातूनच ही वाताहात झाली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यसभा, विधान परिषदेत सर्वपक्षीयांनी मदत केली
आमचा संपर्क सर्व पक्षातील नेत्यांशी होता. राज्यसभेसह विधान परिषदेच्या निवडणुकीतही सर्व पक्षांनी आम्हाला मदत केली. शिवसेनेतील नाराजीचे चित्र उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही दिसू शकेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्यसभेत भाजपने उभे केलेले तीनही उमेदवार निवडून आले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही पाचही उमेदवार निवडून आले. हा देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्षपणाचा उत्तम नमूना आहे. राज्यसभेवेळी पहाटे ४-५ वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस विधिमंडळात थांबले होते. आम्हाला मदत केलेल्या सर्वांना धन्यवाद देतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.