“उद्धव ठाकरेंचीच वृत्ती औरंगजेबासारखी, २०२४ ची लोकसभा सर्वांत वाईट ठरेल”; भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:12 PM2024-03-22T14:12:20+5:302024-03-22T14:14:02+5:30
BJP Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली.
BJP Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दूर केले. सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे, या शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
मुंबईत काँग्रेस नेते नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
उद्धव ठाकरेंना २०२४ ची लोकसभा सर्वांत वाईट ठरेल
उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे. ०४ जून येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. २०२४ ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वांत वाईट निवडणूक असेल, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघात केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांची वृत्ती औरंगजेबाची नाही, असे का म्हणायचे नाही? इथे पराक्रम शिकवावा लागत नाही. आज औरंगजेबाची वृत्ती शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडत आहे. महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.