Join us  

“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 7:00 PM

BJP Chandrashekhar Bawankule News: राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असून लहान भावांना सांभाळण्याची आमची भूमिका आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

BJP Chandrashekhar Bawankule News: विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अखेरचे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने विरोधकांना चहापानाचे निमंत्रण दिले होते. परंतु, महाविकास आघाडीने ते नाकारले अन् सरकारवर हल्लाबोल केला. यातच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती पक्की आहे. राज्यात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. तो लवकर व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते विस्तार करतील. महायुतीच्या नेत्यांना काय वाटत आहे, यापेक्षा मुख्यमंत्र्यांना जेव्हा वाटेल, तेव्हा ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल

आमची महायुती पक्की आहे. आमचा प्रत्येक पदाधिकारी महायुती भक्कम राहील, याकरीता काम करत आहे. ११ पक्षांची महायुती मजबूत आहे. अत्यंत मजबुतीने विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार राहील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत असून लहान भावांना सांभाळण्याची आमची भूमिका आहे. मात्र, कोणाला किती जागा मिळणार, यााबाबतचा निर्णय महायुतीचे नेते घेतील. महायुतीच्या नेत्यांना जागावाटपाबाबत सार्वजनिकरित्या विधाने करू नये, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

टॅग्स :चंद्रशेखर बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळेभाजपामहायुती