Mumbai Rape Case: मुंबईतीलसाकीनाका येथे झालेल्या बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अतिशय अमानुष पद्धतीनं पीडितेवर अत्याचार झाला होता. मुंबईतील राजावाडी रुग्णलयात तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ देखील राजावाडी रुग्णालयात पीडितेच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. पीडितेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्यानंतर चित्रा वाघ अक्षरश: ढसाढसा रडल्या. या प्रकरणावर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. चित्रा वाघ यांनी यावेळी राज्य सरकार आणि महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू
"खरंतर मी आता निशब्द झालेय. आता आमचे शब्द संपलेत. महिलांचा अंत पाहू नका. ज्या पद्धतीनं एका महिलेवर अत्याचार झालाय तो राक्षसी होता. मी तिला बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीनं हे अत्याचार चालले आहेत ते कुठंतरी थांबायला हवं. कुठं चाललोय आपण आणि काय चाललंय हे. महाराष्ट्राच्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका", असं चित्रा वाघ म्हणाल्या.
"गेल्या आठ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत. साडे तेरा वर्षांच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाले. आज सकाळीच अमरावतीत एका सतरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिनं स्वत:चं जीवन संपवलं आणि आज साकीनाक्यातील पीडितेचा मृत्यू झाला. आपण फक्त बघतोय. बाकी काहीही करू शकलो नाही आहोत. राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकारच उरला नाहीय", असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार हल्लाबोल"राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आज या घटनेवर राजकारण करू नका असं म्हणतायत. दिल्लीत काय झालं ते पाहा असं त्या सांगतायत. मला त्यांची लाज वाटते. अहो राजकारण कसलं करू नका. याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर ते आम्ही ते करत राहू. महिला राज्यात सुरक्षित नाहीत आणि त्यावर आम्ही बोललो तर याला तुम्ही राजकारण म्हणता? तुम्ही शक्ती कायद्याचं काय केलं? अॅट्रॉसिटीचं काय केलं? ते बोला", असा जोरदार हल्ला चित्रा वाघ यांनी केला आहे.