मुंबई: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित शक्ती विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले. शक्ती कायद्याचे विधेयक मागच्या अधिवेशनात अधिक विचारासाठी विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले होते. समितीने सुचवलेल्या सुधारणांसह गुरुवारी शक्ती कायद्याचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले व ते एकमताने मंजूर करण्यात आले. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेला डिवचले आहे. शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
आताच्या घडीला राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सभागृहात नेत्यांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. विधानसभेत महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आले. त्यावेळी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी भाजपला झोंबणारे वक्तव्य केले होते. याच मुद्द्यावरुन आता चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी अजय चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदारावर दाखल करावा
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले असून, महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे, हे आमदार अजय चौधरी यांच्या विधानातून दिसून आलंय… त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरलीय.. माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा..!, असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अजय चौधरी नेमके काय म्हणाले होते?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार प्रत्येक माता-भगिनीचा आदर झाला पाहिजे, असे म्हणाले. यामध्ये पक्षीय राजकारणही येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. पण भाजप महिला पदाधिकारी एरवी जरासे काही झाले की, लगेच सावित्रीच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत, ओरडत सुटतात. मग मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ही सावित्रीची लेक नव्हे का, अशी विचारणा अजय चौधरी यांनी उपस्थित केला. मुंबईचा महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे महापौरांविषयी आमच्या मनात आदराची भावना आहे. महापौर आमची शान आणि मान आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही. मुंबईबाहेरुन आलेल्या लोकांना ही गोष्ट समजणार नाही, असेही अजय चौधरी यांनी म्हटले होते.