Join us

“ओ मोठ्ठ्या ताई... आमच्या भगिनी तुमच्यासारखे एकरी १०० कोटींची वांगी पिकवू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 5:32 PM

Chitra Wagh Vs Supriya Sule: लेक लाडकी योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.

Chitra Wagh Vs Supriya Sule: सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लेक लाडकी नावाची योजना घोषित केली आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर कडक शब्दांत टीका केली. या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

महिलांचा द्वेष करणारा पक्ष आता लेक लाडकी म्हणत आहे. गेली अनेक वर्ष जवळून मी सगळे पाहत आहे. नवीन संसद भवन सुरू करण्याचा मान सर्वोच्च पदावर बसलेल्या महिलेचा होता. मात्र, तो दिला नाही. दिवंगत सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. या सगळ्या त्यांच्या वडिलांच्या लाडक्या लेकीच होत्या. यांच्यावर अन्याय केला जात आहे. या पक्षाचा सगळा वेळ पक्ष फोड, कुटुंब फोड यातच जात आहे. बाकी कोणत्या कामासाठी यांच्याकडे वेळ नाही. एकनाथ खडसेंना त्रास देण्यासाठी गिरीश यांना कारागृहात टाकले. मेधा कुलकर्णी यांचेही तिकीट कापले, अशी उदाहरणे देत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली. 

आमच्या भगिनी तुमच्यासारखे एकरी १०० कोटींची वांगी पिकवू शकत नाही

चित्रा वाघ यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणे हे तुमचे कर्तव्यच आहे ना जणू …? राज्यातील आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी १०० कोटींची वांगी नाही ना पिकवू शकत ताई... नविन जन्माला येणाऱ्या मुलीला १लाख १ हजार रूपये मिळणार आहेत तर तुमच्या का पोटात दुखतय... ती लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावर थोडीच कुणी आघात करतय???? राहिला प्रश्न आमच्या पक्षातील महिलांचा तर तर भाजपा इतकी चांगली वागणूक अन्य पक्षात नाहीच… आजच तुमच्या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ का घातला??? त्यांनी तुमच्याच पक्षात डावललं जात असल्याची भावना का व्यक्त केली याचं चिंतन करा मोठ्ठया ताई… आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून …ही तऱ्हा जुनी झाली… ताई... अब पब्लीक सब जानती है …बर का मोठ्ठ्या ताई, अशा खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला येणारी महाराष्ट्रातली लेक आता लखपती होणार आहे. राज्यातल्या आपल्या महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि  मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या सर्वसमावेशक महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेला हा निर्णय आहे असं सांगत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

 

टॅग्स :चित्रा वाघसुप्रिया सुळेसुप्रिया सुळे