“सामान्यांसाठी मातोश्रीसमोरील रस्ता कशामुळे बंद असतो, हे सांगा एकदा”; संजय राऊतांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 02:51 PM2023-11-02T14:51:10+5:302023-11-02T14:52:29+5:30
BJP Vs Shiv Sena Thackeray Group: श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.
BJP Vs Shiv Sena Thackeray Group: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या लुईसवाडी भागात पोलिसांनी सर्व सामन्यांसाठी रस्ता बंद केला. या प्रकरणी रात्री उशिरा खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हा रस्ता खुला करण्यात आला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली.
एक्सवर एक पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? ठाकरे राजपरिवाराच्या या मातोश्री नामक किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी किती पोलीस पहारे, किती नाका बंदी आणि किती अडथळे पार करावे लागतात, हेही जनतेला कळू द्या. सर्वसामान्यांसाठी मातोश्रीसमोरचा रस्ता कशामुळे बंद असतो, हेही सांगाच एकदा, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला.
एकास एक आणि दुसऱ्यास दुसरा असा भेदभाव देवेंद्र फडणवीस करत नाहीत
कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकास एक आणि दुसऱ्यास दुसरा, असा भेदभाव करत नाहीत, हे आपल्याच उदाहरणावरून कळले असेलच. तुमची महाज्ञानी टिवटिवही देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षाव्यवस्थेच्या छत्रछायेत चाललेली असते, याचा विसर पडू देऊ नका. तुमच्या सरकारच्या गृहमंत्र्यांनी वसुली धंदे केले;देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचे पोलीस कुणाचे मिंधे नाहीत…हे लक्षात घ्या सर्वज्ञानी, या शब्दांत चित्रा वाघ यांनी सुनावले.
दरम्यान, वांद्र्याच्या कलानगर सोसायटीत २७ बंगले आहेत. या सोसायटीत एकापेक्षा एक मोठे दिग्गज कलाकार किंवा त्यांचे वारस रहातायत. यातल्या कुठल्याच बंगल्याला बीकेसीच्या बाजूने बाहेर पडण्याची सोय नाही. मग एकाच ‘बंगल्या’ला ही विशेष सोय का दिली गेलीय. यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणी हात पसरले होते हे महाराष्ट्राला कळले तर धक्का बसेल. या बंगल्यातील रहिवाश्यांच्या बंदोबस्ताच्या कित्येक गाड्या म्हाडा कंपांऊंडमध्ये पार्क होतात..ही सोय याच वारसांना का..?? असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.