Kiran Mane: “महिलांचा विनयभंग करणाऱ्याला सत्ताधारी पाठीशी घालताहेत, या सोंगाड्यावर कारवाई करा”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:10 PM2022-01-17T13:10:54+5:302022-01-17T13:12:12+5:30
किरण मानेंचे बोलवते धनी कोण आहेत, अशी विचारणाही भाजपकडून करण्यात आली आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून किरण माने (Kiran Mane) यांची वक्तवे आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे केवळ टीव्ही जगतात खळबळ उडालेली नाही, तर आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि आता त्यांनतर भारतीय जनता पक्षानेही या वादात उडी घेतली आहे. किरण मानेचे बोलवते धनी कोण आहे, अशी विचारणा करत या सोंगाड्यावर कारवाई करत शिक्षा झालीच पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्विट करत किरण मानेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच या प्रकरणावरून ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे. मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं, असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या सोंगाड्यावर कारवाई करा, शिक्षा झालीच पाहिजे
महिलांचा विनयभंग व पंतप्रधानांवर विखारी टिका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत, असा मोठा आरोप करत, कोण आहेत मानेचे बोलवते धनी, या सोंगाड्यावर कारवाई करा. शिक्षा झालीचं पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण इतक्या दिवसात असा कुठलाही अनुभव आलेला नाही. कुठलेही चॅनेल असे करत नाही. किरण माने यांच्या मताशी सहमत नाही. त्यांना मोठे व्हायचे आहे म्हणून ते हे सगळे करत आहेत, अशी प्रतिक्रिया आदेश बांदेकर यांनी या वादावर दिली आहे.
दरम्यान, किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिलाय. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले. किरण माने यांचा आरोप आहे की, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केले गेले. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल, असे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले होते.