भाजपने वाढवली शिवसेनेची ‘धकधक’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 01:25 AM2020-02-29T01:25:28+5:302020-02-29T01:28:37+5:30
विरोधी पक्षनेतेपद मिळण्याच्या मार्गात तांत्रिक पेच, महासभेत निर्णय घेणार
मुंबई: महापालिकेतील विरोधी पक्ष शिवसेनेच्या सुरात सूर मिसळत असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. त्यामुळे अखेर पहारेकऱ्याची भूमिका सोडून विरोधी पक्षनेते पदावर भाजपने दावा केला आहे. सत्ताधारी शिवसेनेची धकधक यामुळे वाढली असून, याबाबत चिटणीस व विधि खात्याचे मत मागविण्यात येणार आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळूनही भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले. मात्र दुसरा मोठा पक्ष असूनही विरोधी बाकावर न बसता त्यांनी पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारली. त्या पहिल्या वर्षी भाजप सदस्यांनी आपली आक्रमकता विविध समित्यांच्या बैठकीत दाखवली. मात्र राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाली आहे. यामुळे महापालिकेतही काँगेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष शिवसेनेबरोबर आहे.
परिणामी, भाजप महापालिकेत एकाकी पडला आहे. स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत भाजप नगरसेविका आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात चांगलीच जुंपली. त्यानंतर तत्काळ दुसºया दिवशी भाजपने ज्येष्ठ नेते प्रभाकर शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठविले आहे. या पत्रावर पालिकेच्या चिटणीस खात्याचे मत घेतल्यानंतर पुढच्या आठवड्यातील महासभेत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
अशा आहेत अडचणी...
भाजपचे विद्यमान गटनेते मनोज कोटक खासदार बनल्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन गटनेता गेले आठ-नऊ महिने नेमण्यात आलेला नाही. मात्र आता भाजपने नवीन गटनेत्याचे नाव महापौरांना न कळवता थेट विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केला आहे. गटनेतेपदी भाजपने विनोद मिश्रा यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र याबाबत महापौर, सभागृहाला कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी असे घडले नसल्याने सर्व जुन्या आधारांचा अभ्यास केला जाणार आहे.
भाजपच्या गटनेतेपदी विनोद मिश्रा
मुंबई: महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी नगरसेवक विनोद मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई भाजप युवा मोचार्चे सचिव आणि सहकारी को आॅपरेटिव्ह बँकेचे ते अध्यक्ष आहेत. सामाजिक कार्यकर्ता, बँकर, यशस्वी व्यावसायिक आणि राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. २०२०मध्ये होणाºया मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पहिल्यांदाच उत्तर भारतीय गटनेता दिलेला आहे. भाजपने नवीन या नियुक्तीबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे सूचित केल्यानंतर पालिका महासभेत याबाबत घोषणा केली जाणार आहे.
शिवसेनेला करावा लागणार भाजपचा सामना
भाजप विरोधी पक्षात आल्यास शिवसेनेची पुरती कोंडी होणार आहे. भाजपने आपली आक्रमकता कायम ठेवल्यास शिवसेनेला पुढची दोन वर्षे त्यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपचा दावा फेटाळण्यासाठी मनसुबे आखले जात आहेत. भाजपने आधी विरोधी पक्षनेतेपदावर दावा न केल्यामुळे काँग्रेसचे रवी राजा यांना हे पद मिळाले. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. अशावेळी दुसरा विरोधी पक्षनेता कसा नेमणार, असा सवाल उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.